Kalingad Lagwad : अलीकडे शेतीमध्ये महत्त्वाचा बदल झालेला आहे. पारंपारिक पिकांसोबतच आता नगदी आणि फळ पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे आणि शेतकऱ्यांना या आधुनिक शेतीतून चांगला पैसा पण मिळतोय. शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे वळलेत त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
फळ पिकात अनेक अशी पिके आहेत जी की हंगामी स्वरूपात लागवड केली जातात आणि शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळते. कलिंगड हे सुद्धा असंच एक हंगामी फळ पीक आहे.या फळाला बाजारात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वाधिक मागणी असते.

जर या पिकाचे योग्य नियोजन झाले तर शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पादन मिळते आणि कमी दिवसांमध्ये चांगला पैसा कमावता येतो. कलिंगड पीक लागवडीत तीन घटक महत्त्वाचे ठरतात यातील पहिला घटक आहे हवामान दुसरा घटक आहे मार्केट आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजेच वाण.
योग्य जातीची, योग्य हवामानात आणि योग्य सीजनमध्ये लागवड केली तर हे पीक शेतकऱ्यांना प्रचंड नफा देऊन जाते. दरम्यान कलिंगडचे वाण निवडताना शेतकऱ्यांनी एका महत्वपूर्ण घटकाचा विचार केला पाहिजे आणि तो घटक आहे पिकाचा कालावधी.
आपले पीक किती दिवसात तयार होणार हे पाहूनच शेतकऱ्यांनी कलिंगडाच्या वाणाची निवड करायला हवी. दरम्यान, आज आपण हिवाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशा कलिंगडच्या टॉप 5 जातींची नावे अन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
हिवाळी हंगामासाठी उपयुक्त कलिंगड जाती
मेलोडी – कलश सीड्स कंपनीचे आईस बॉक्स प्रकारातील ही व्हरायटी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीची लागवड फक्त हिवाळी हंगामातच केली जाते. उन्हाळ्यात लागवड केल्यास फळ क्रॅक होण्याची भीती असते. या जातीच्या फळाचा आकार गोल आयताकृती असतो आणि या जातीचे पीक साधारणता 65 ते 70 दिवसात काढण्यासाठी रेडी होते. या जातीच्या फळांचे वजन अडीच ते साडेतीन किलो भरते.
मॅक्स – BASF कंपनीची मॅक्स व्हरायटी सुद्धा अलीकडे फारच पॉप्युलर झालीये. आईस बॉक्स प्रकारातील या जातीच्या फळांचा आकार हा प्रामुख्याने गोल असतो. या जातीची लागवड सुद्धा फक्त हिवाळी हंगामातच करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पिक कालावधी हा साधारणता 70 ते 75 दिवसांचा आहे आणि या जातीचे फळ तीन ते चार किलो वजनाचे असते.
आयशा – Nunhems कंपनीची आयशा ही व्हरायटी सुद्धा हिवाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे. शुगर बेबी प्रकारातील ही व्हरायटी 65 ते 70 दिवसात तयार होते या जातीच्या फळाचा आकार गोल असतो. फळांचे वजन हे साधारणतः दोन ते तीन किलो दरम्यान असते. या जातीची सुद्धा उन्हाळी हंगामात लागवड करू नये अन्यथा नुकसान होऊ शकते.
कॅण्डी – कलश सीड्स कंपनीची आणखी एक वरायटी म्हणजेच कॅंडी. ही व्हरायटी सुद्धा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. हिवाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असणारा कलिंगडचा हा वाण आईस बॉक्स प्रकारातील आहे. या जातीच्या फळांचा आकार गोल असतो आणि पीक कालावधी 65 ते 70 दिवस आहे. फळांचे वजन साधारणतः दोन ते तीन किलो असते.
शुगर क्वीन – सिजेंटा कंपनीची शुगर क्वीन व्हरायटी सुद्धा हिवाळ्यात लागवडीसाठी उपयुक्त आहे. या जातीच्या फळाचे वजन चार ते पाच किलो दरम्यान असते. या वाणाचे पीक 70 ते 75 दिवसात परिपक होते. या जातीच्या फळांचा आकार हा गोल असतो आणि उन्हाळ्यात याची लागवड टाळावी असा सल्ला दिला जातो.