Kolhapur News : महाराष्ट्रात सद्यस्थितीला पुण्यातील हिंजवडी येथे देशातील दुसरे मोठे आयटी पार्क अस्तित्वात आहे. यामुळे पुण्याला आयटी हब असा दर्जा प्राप्त आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक नवयुवक तरुण पुण्यातील हिंजवडी येथे कामासाठी येतात. हिंजवडीमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
पुण्याच्या एकात्मिक विकासात येथील आयटी पार्कचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि पुण्याला लवकरच दुसरे एक मोठे आयटी पार्क मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे आयटी पार्क उभारणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

पुरंदर पाठोपाठ साताऱ्यात सुद्धा आयटी पार्क तयार करण्यात येणार आहे. साताऱ्यातील आयटी पार्कच्या प्रकल्पाला देखील वेग आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सातारा येथे आयटी पार्क तयार करण्याआधी टाटा टेक्नॉलॉजीकडून ट्रेनिंग सेंटर विकसित केले जाणार आहे आणि या ट्रेनिंग सेंटर मध्ये हजारो तरुणांना आयटी सेक्टरशी निगडित प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, आता हिंजवडी पुरंदर आणि सातारा पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका बड्या जिल्ह्याला आयटी पार्कची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे सुद्धा आयटी पार्क विकसित केले जाणार असून कोल्हापूरच्या आयटी पार्कचा विषय आता मार्गी लागला आहे.
खरंतर कोल्हापूरच्या आयटी पार्कचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर होता मात्र आता तो प्रत्यक्षात जमिनीवर उतरतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना कोल्हापूर आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथे जागा देण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे आता कोल्हापूरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असून जिल्ह्यातील हजारो हातांना काम मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयटी पार्क साठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा एक सविस्तर प्रस्ताव आणि त्यावरील पुणे विभागीय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण अहवाल अप्पर मुख्य सचिवांना प्राप्त झाला.
दरम्यान, आता मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर कोल्हापूर आयटी पार्क, जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी अप्पर मुख्य सचिवांकडून जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
खरे तर आयटी पार्कला शेंडा पार्क येथील कृषी विभागाची जमीन घेण्यात येणार असल्याने कृषी विभागाला पर्यायी जागा देण्याबाबत राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष घातले होते. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात आमदार क्षीरसागर यांनी सुद्धा याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार महाडिक यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे आयटी पार्कसाठी 34 हेक्टर, जिल्हा क्रीडा संकुल साठी 6 हेक्टर आणि शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन हेक्टर अशी एकूण 42 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव यांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार आता कोल्हापुरातील आयटी पार्क साठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांकडून प्राप्त झाले आहेत.
अर्थात, आता कोल्हापुरातील आयटी पार्कचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विषय मार्गी लागणार असल्याची आशा व्यक्त होत आहे. म्हणजेच पुरंदर सातारा आणि कोल्हापुरात आयटी पार्क तयार झाले तर महाराष्ट्रात एकूण चार आयटी पार्क असतील. कोल्हापुरातील आयटी पार्क हे राज्याचे चौथे आयटी पार्क राहणार आहे.













