Kolhapur Pune Train : मार्च महिना आता समाप्तीकडे आलाय अन आता उन्हाळी सुट्ट्या सुरु होतील. यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात की रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढते, म्हणून प्रवाशांना तिकीट सुद्धा मिळणे कठीण होते.
हीच गोष्ट विचारात घेऊन आता मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोल्हापूर ते कटिहार दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी पुण्या मार्गे चालवली जाईल आणि यामुळे कोल्हापूर ते पुणे तसेच पुढे कटिहार पर्यंतचा प्रवास वेगवान होणार अशी आशा आहे.

दरम्यान आज आपण कोल्हापूर ते कटिहार दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा राहणार समर स्पेशल ट्रेन चे वेळापत्रक
कोल्हापूर – कटिहार – कोल्हापूर साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. 01405 कोल्हापूर-कटिहार साप्ताहिक विशेष गाडी 6 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या काळात चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी रविवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून नऊ वाजून 35 मिनिटांनी रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सहा वाजून दहा मिनिटांनी कटिहार येथे पोहोचणार आहे. म्हणजे या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होतील.
तसेच गाडी क्र. 01406 कटिहार कोल्हापूर साप्ताहिक स्पेशल ट्रेन 08.04.2025 ते 29.04.2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी 18:10 वाजता कटिहार येथून रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी 15:35 वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे.
या गाडीच्या एकूण चार ट्रिप होतील. यामुळे कोल्हापूर ते कटिहार असा प्रवास वेगवान होणार आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहूयात.
समर स्पेशल ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर ते कटिहार समर स्पेशल ट्रेन या मार्गावरील महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. राज्यातील मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, या महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.
भुसावळच्या पुढे ही गाडी खांडवा, इटारसी, जबलपूर कटनी, सटाणा, प्रयागराज छेकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगरिया, नौगाचिया या स्थानकावर थांबणार आहे.