Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला असून,
आता महिलांना डिसेंबर महिन्याच्या म्हणजेच १८व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा होती.

मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा झाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण असून १५ आणि १६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर डिसेंबरचा हप्ता निवडणुकांमुळे रखडला असल्याची चर्चा सुरू आहे.
मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मात्र डिसेंबरचा हप्ता पुढे ढकलण्यामागे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आलेला असला तरी डिसेंबरच्या हप्त्यासाठी अद्याप अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली नाही. सध्या आचारसंहिता लागू असल्याने १५ जानेवारीपूर्वी या हप्त्यासाठी निधी मंजूर होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे महापालिका निवडणुका पार पडेपर्यंत महिलांना डिसेंबरच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागू शकते.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना आणि आचारसंहितेचा थेट संबंध नाही.
आचारसंहिता असली तरी योजनेचा हप्ता देणे शक्य आहे. तरीही अद्याप पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान एक दिलासादायक बातमी अशी की, जानेवारी महिन्यात महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास लाभार्थी महिलांना जानेवारीत ३००० रुपयांचा डबल गिफ्ट मिळू शकतो. आता सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.












