Ladaki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार असे जाहीर केले. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे.
तरीही सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे पैसे देण्याची घोषणा केली. पण यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. फडणवीस सरकारची ही घोषणा आदर्श आचारसंहितेचा भंग करते असं विरोधी पक्षाच म्हणणं आहे.

तसेच अशा प्रकारचा निधी वितरित करणे म्हणजेच महिलांना प्रलोभन देण्यासारखे आहे असा आरोप करत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा केले जाणार होते.
पण काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत भाजपवर गंभीर आरोप केल्याने राज्य निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आले आहे. याबाबत आयोगाने थेट राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अद्याप याबाबत राज्य निवडणूक आयोगाला उत्तर मिळालेले नाही.
मात्र लवकरच राज्य शासनाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला आहे का, तसेच तो केव्हा अंमलात आणला जाणार आहे, याची माहिती आयोगाने मागितली आहे.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला होता. मतदानाच्या आधी अशा स्वरूपाची आर्थिक मदत देणे हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असून, महिलांना अप्रत्यक्षपणे मतदानासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यामुळे आयोगाने या वितरणाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. आता राज्य सरकार या आरोपांवर काय खुलासा करते हे पाहावे लागेल. तसेच निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतो याकडे राज्यातील जनतेचे लक्ष राहणार आहे.













