Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 14 जानेवारी रोजी मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जातील अशी माहिती दिली आहे.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यास त्यांना दिलासा मिळेल. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने, योजना आणि विकासाची स्वप्ने दाखवली जात आहेत. विशेषतः महिला मतदार वर्गावर लक्ष केंद्रीत करत ‘लाडकी बहीण योजना’ हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य करून राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.
घाटकोपर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतील आर्थिक मदतीत वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असून, ही रक्कम लवकरच वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले. “मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली.
आता कोणीही काहीही बोलो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट लाडक्या बहिणींना मिळणारे १५०० रुपये आम्ही वाढवणार आहोत,” असे ठाम वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. “आमच्या वचननाम्यात जे सांगितले आहे, ते आम्ही पूर्ण करणार. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे.
प्रत्येक लाडकी बहीण लखपती व्हावी, हे आमचे स्वप्न आहे,” असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. ही योजना अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आणि महायुतीसाठी गेमचेंजर असल्याचे मानले जाते. महिलांना थेट आर्थिक मदत मिळाल्याने या योजनेचा मोठा फायदा झाला.
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्त्वाचा इशारा दिला होता. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले होते की, लाडकी बहीण योजनेतील मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचा निर्णय योग्य वेळी आणि शासकीय नियमांनुसार घेतला जाईल.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, महिला मतदारांचा कल कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













