Ladaki Bahin Yojana : राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा १५०० रुपयांचा सन्मान निधी दिला जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील काही नेत्यांनी, विशेषतः भाजप आणि शिवसेनेकडून, हा निधी वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.
आता राज्यात सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असतानाही सन्मान निधीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे “२१०० रुपये कधी मिळणार?” असा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या योजनेची चर्चा रंगली आहे. एका प्रचार कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे. मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल.
लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं.” त्यांनी या योजनेसाठी सरकारला वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येत असल्याचेही स्पष्ट केले. “भल्याभल्यांची हिंमत झाली नाही अशी योजना आम्ही सुरू केली. ज्यांनी या योजनेत खोडा घातला, त्यांना लाडक्या बहिणींनी २३२ नंबरचा जोडा दाखवला,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या इतिहासात महायुतीला २३२ जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक सक्सेस स्टोरीज समोर आल्या असून महिलांना याचा थेट फायदा झाला आहे. “१५०० रुपयांचे २१०० रुपये योग्य वेळी करणार, हा शब्द आम्ही लाडक्या बहिणींना दिला आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो,” अशी ठाम ग्वाहीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये थेट जमा केले जातात.
विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरली असून, महायुतीला निवडणुकीत याचा मोठा राजकीय फायदा झाल्याचे मानले जाते.
आता मात्र महिलांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे-सन्मान निधी २१०० रुपये नेमका कधी वाढणार? सरकारकडून यावर ठोस घोषणा कधी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.













