Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक कठोर आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, हा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, तिची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांचा लाभ पुढील काळात थांबवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, ई-केवायसी केल्यानंतरही काही महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसीनंतर लाभ बंद होण्यामागील मुख्य कारण म्हणजे अपात्रता. ही योजना केवळ खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच मिळावी, यासाठी कठोर निकष लागू करण्यात आले आहेत.
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलांची वैयक्तिक, आर्थिक आणि कौटुंबिक माहिती तपासली जाणार असून, निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे योजनेच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत.
ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांचा वयोगट २१ ते ६५ वर्षांमध्ये येत नाही, ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे किंवा एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला आधीच लाभ घेत आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ई-केवायसी करताना महिलांना स्वतःची माहिती भरावी लागणार असून, पती किंवा वडिलांची माहिती तसेच त्यांची केवायसी करणेही आवश्यक आहे.
ही सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे पाठवली जाणार असून, तपासणीनंतर अपात्र महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाईल. योजनेतील गैरप्रकार, चुकीचे लाभार्थी आणि फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारने यासाठी विशेष अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिले असून, लाभार्थी महिलांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा, दरमहा मिळणाऱ्या १ हजार ५०० रुपयांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.













