Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान एकनाथरावजी शिंदे यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो.
राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आणि २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. दरम्यान तुम्हीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे.

विशेषता ज्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला गेला असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरू शकते. आज आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ केवायसी झालेला असतानाही का मिळत नाही याबाबतचा आढावा येथे घेणार आहोत.
मंडळी, राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण आहे.
सरकारकडून मकरसंक्रांतीच्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे न पोहोचल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
प्रशासनाकडून सुरुवातीला ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे हप्ता रोखण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, अनेक महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. यामुळे केवळ ई-केवायसीच नव्हे, तर इतर पात्रता निकषही लाभासाठी निर्णायक ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केवायसी प्रक्रियेदरम्यान महिलांच्या वडिलांचे किंवा पतीचे उत्पन्न नोंदवले जाते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्या महिलांना या योजनेत अपात्र ठरवण्यात येत आहे. याआधी काही महिलांनी उत्पन्न निकषात न बसत असूनही योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच प्रशासनाने केवायसी बंधनकारक करून पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू केली.
सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. या तारखेपर्यंत केवायसी न केलेल्या किंवा उत्पन्न निकषात न बसणाऱ्या महिलांचे हप्ते थांबवले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्या महिला सध्याच्या निकषांनुसार अपात्र ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता दिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता सर्वांचे लक्ष जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे लागले असून, अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांकडून पुन्हा एकदा अर्ज प्रक्रियेबाबत किंवा निकषांबाबत स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. महिलांसाठी मोठा आधार मानली जाणारी ही योजना अधिक पारदर्शक आणि स्पष्ट पद्धतीने राबवावी, अशी अपेक्षा लाभार्थींमधून व्यक्त होत आहे.













