Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली शासनाची एक महत्वाची योजना आहे. याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात असून जुलै 2024 पासून या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळणे सुरू आहे.
मात्र या योजनेचा अनेकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारने याचे नियम कठोर केले आहेत. शासनाने या योजनेच्या लाभासाठी आता केवायसीची सक्ती केली असून याच केवायसी प्रक्रिया बाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेच्या केवायसीच्या जाचक अटीतून काही महिलांना दिलासा दिला आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांना या योजनेची केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
दरम्यान याच वडील किंवा पतीचे छत्र हरपलेल्या लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खरे तर लाडक्या बहिणींना केवायसी साठी पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते.
आता ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना हे करता येणे शक्य नव्हते. वडील किंवा पती हयात नसलेले तसेच घटस्फोटीत महिलांना केवायसीच करता येत नव्हती. मात्र आता मृत्यू प्रमाणपत्र किंवा तत्सम कागदपत्रे सादर केल्यास या महिलांना सुद्धा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
त्यानुसार आता संबंधित महिलांनी प्रथम स्वतःची ई-केवायसी पूर्ण करावी मग त्यानंतर पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत महिला व बाल विकास विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. हे आवश्यक कागदपत्रे संबंधित महिला आपल्या अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा जमा करू शकतात.
केवायसीसाठी किती दिवसांची मुदत आहे
शासनाने सुरुवातीला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत केवायसी प्रक्रियेसाठी मुदत दिलेली होती. दोन महिन्यांच्या मुदतीत महिलांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते.
मात्र सुरुवातीच्या टप्प्यात केवायसी करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि यामुळे मुदत वाढीची मागणी जोर धरत होती. अखेर आता शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मात्र ही पहिली आणि शेवटची मुदत वाढ राहणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनी या मुदतीत केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी केली नाही तर लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाईल असे सुद्धा बोलले जात आहे.













