Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. खरे तर या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळतोय आणि म्हणूनच लाखो महिलांसाठी ही योजना आर्थिक फायद्याची ठरली आहे.
मात्र या योजनेचा अनेक पात्र लोकांनी लाभ घेतला आणि म्हणूनच यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली.

केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या तारखेपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली मात्र 30 लाख लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत केवायसी केलेली नाही.
त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही मिळाला नाही. खरे तर नोव्हेंबर चा हप्ता एक जानेवारी 2026 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.
नोव्हेंबर महिन्याचाचा हप्ता मिळाल्यानंतर आता या योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचे आतुरता लागली आहे आणि याच संदर्भात आता महत्त्वाचे अपडेट पण समोर आली आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. महाजन यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडल वर एक पोस्ट शेअर करत लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे मकर संक्रांतीच्या आधी मिळणार असल्याचा दावा केला आहे.
म्हणजेच राज्यातील लाडक्या बहिणींना 14 जानेवारी 2026 पूर्वी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे मिळू शकतात. अद्याप या संदर्भात शासनाचे परिपत्रक जाहीर झालेले नाही पण स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली असल्याने 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या 15 तारखेला राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया 15 तारखेला पूर्ण होईल आणि येत्या 16 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दरम्यान याच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून दोन महिन्यांचे पैसे सोबतच लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतच भाजपचे महानगरपालिका निवडणुकीमधील उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना हा लाभ मिळेल, असा दावा केला आहे.
दुसरीकडे, महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने नवीन निधी जारी करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे निधीसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागू शकते, अशी पण शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पुढील हप्ते हे फक्त केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहेत.













