लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची तारीख लांबली, आता ‘या’ मुहूर्तावर जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेची सुरुवात जून 2024 मध्ये झाली आणि या योजनेचा जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ मिळू लागला.

या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणून या योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला.

पण, निवडणूक प्रचारादरम्यान सरकारकडून महिलांना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र आता नवीन सरकार स्थापित होऊन बरेच दिवस उलटल्यानंतरही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र सुरू असलेल्या एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता अनेक महिलांमध्ये होती.

या पार्श्वभूमीवर, महिला आणि बाल विकास खात्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ सात एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असे म्हटले जात होते.

मात्र आता एप्रिल महिन्याच्या हफ्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा हफ्ता 30 तारखेला जमा होण्याची शक्यता आहे.

30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया असल्याने, या शुभमुहूर्तावरच लाडकी बहिणींच्या खात्यात योजनेचा हप्ता जमा केला जाणार असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या खात्याकडून सांगण्यात आले आहे.

या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांना घरखर्च, मुलांचे शिक्षण व वैयक्तिक गरजा भागवताना दिलासा मिळत आहे. त्यामुळे एप्रिलच्या हप्त्याची प्रतिक्षा असलेल्या महिलांना आता दिलासा मिळणार आहे.