Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असे जाहीर केले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत.
खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा खटका बसला होता. मात्र त्यानंतर महायुती सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे सध्या महायुती सरकार साठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती तयार होत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या घोषणेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फायदा होईल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता विरोधकांकडूनही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
ही योजना फक्त निवडणुकांपूरती सुरू राहणार असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम वापरली जात आहे, आदिवासींच्या योजनांचा पैसा या योजनेसाठी खर्च केला जात आहे असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान आता याच आरोपानंतर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी, ‘लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या योजनेतून अनेक महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय.
ही योजना थांबवण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.तुमच्या काळात कधीच अशी योजना आली नाही, आता आमच्या योजनेवर का पोटदुखी होतेय?’, असं म्हणतं विरोधकांवर टीका केली.
अजित पवारांनी विरोधकांना खडे बोल सुनावत ही योजना तुमच्या घरची आहे का? मग तुम्ही ते बंद करण्याची चर्चा का करत आहात ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी आश्वासन दिले की, राज्याच्या आर्थिक स्थितीची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्यासाठी ते केंद्रातून आवश्यक निधी आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. तसेच, त्यांनी विरोधकांवर आरोप करत म्हटले की, सध्या महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी अर्थमंत्री आहे, मला राज्याची स्थिती माहीत आहे.
पुढे त्यांनी ही योजना महायुतीचे सरकार आले तर सुरू राहील मात्र विरोधकांचे सरकार आले तर बंद होईल असे विधान केले आहे. एकंदरीत लाडकी बहीण योजनेसाठी आपण वेळ पडली तर केंद्राकडून निधी मागवू पण ही योजना बंद होऊ देणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी जनतेसमोर मांडली आहे.