Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
दरम्यान आता सरकारने या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे सरकारने अधिकृतरीत्या मान्य केले आहे.

योजनेच्या प्राथमिक तपासणीत तब्बल 32 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले असून अपात्र लाभार्थ्यांनी शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, योजनेअंतर्गत एकूण 26 लाख महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे.
विशेष म्हणजे, नियमांनुसार पुरुषांना कोणताही लाभ मिळणार नसतानाही 14 हजार 297 पुरुषांनी या योजनेचा फायदा उचलला आहे. यामुळे योजना राबविताना अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आणि पडताळणी प्रक्रियेतील मोठे दुर्लक्ष उघड झाले आहे.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे अपात्र लाभार्थ्यांमध्ये सुमारे 9,500 हून अधिक शासकीय कर्मचारी असल्याचे सरकारने कबूल केले आहे. शासनाच्या पगारावर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी स्वतःला पात्र दाखवत आर्थिक लाभ मिळवला असून, याला गंभीर स्वरूपाचे आर्थिक अनियमितता मानले जात आहे.
शासनाने विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, ज्या शासकीय कर्मचारी आणि पुरुष लाभार्थ्यांनी चुकीने किंवा जाणूनबुजून आर्थिक लाभ घेतला, त्यांच्याकडून योजनेअंतर्गत मिळालेली सर्व रक्कम वसूल केली जाणार आहे. तसेच, संबंधित विभागांना याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणानंतर राज्यात चर्चा आणि टीकेची लाट उसळली आहे. सामाजिक न्याय व महिला कल्याण योजनांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार कसा झाला, पडताळणीची यंत्रणा इतकी ढिसाळ का ठरली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. योजनेचा वास्तविक लाभ गरजू महिलांना मिळावा, यासाठी अधिक काटेकोर प्रणाली विकसित करण्याची मागणी आता विविध स्तरांतून होत आहे.
सरकारने पुढील काळात पडताळणी प्रक्रिया अधिक बळकट करण्याचे संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा राज्यभरातून व्यक्त होत आहे.













