Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरू झाला असला, तरीही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे “जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?” आणि “फेब्रुवारीचे पैसे येणार का?” असे प्रश्न लाभार्थी महिलांकडून विचारले जात आहेत.
दरम्यान, सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीचा तसेच आगामी फेब्रुवारीचा हप्ता सर्व महिलांना सरसकट मिळणार नाही, तर फक्त पात्र आणि केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच हा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही, किंवा केवायसी करताना चुकीची माहिती भरली आहे, अशा महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे या महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होणार नाही. यामध्ये अनेक महिलांनी अनावधानाने चुकीची उत्तरे दिल्यामुळे त्यांचा लाभ अडकला आहे.
केवायसीमध्ये चुका आढळल्यानंतर संबंधित महिलांची प्रत्यक्ष पडताळणी सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका आणि संबंधित कर्मचारी महिलांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत.
या महिलांची आर्थिक स्थिती, कुटुंबातील सदस्य, तसेच सरकारी नोकरीसंबंधीची माहिती तपासली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे. तोपर्यंत या महिलांना कोणताही हप्ता मिळणार नाही.
विशेष म्हणजे, ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, अशा महिलांना जानेवारीचा हप्ताही मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आधीचा हप्ता अडकलेल्या महिलांनी तातडीने आपल्या केवायसीची स्थिती तपासणे आवश्यक आहे.
केवायसी करताना “तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का?” या प्रश्नाला अनेक महिलांनी चुकीचे ‘होय’ असे उत्तर दिले. प्रत्यक्षात या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे असणे आवश्यक होते. या एका चुकीच्या उत्तरामुळे अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर केवायसीमधील चुका लवकरात लवकर दुरुस्त करणे, तसेच पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पात्रता सिद्ध झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे.













