Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
जुलै 2024 पासून ही योजना सुरू झाली असून या अंतर्गत आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 अशा दहा महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. एप्रिल महिन्याचा लाभ हा दोन मे 2025 रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला.

दरम्यान मे महिन्याचा हप्ता देखील येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. अशातच आता या योजनेच्या बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. खरे तर या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देऊ असं आश्वासन महायुतीने दिलेले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून अशी घोषणा करण्यात आली होती. पुन्हा आमचे सरकार आले की लगेच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळेल असे महायुती मधील नेत्यांकडून सांगितले जात होते.
पण प्रत्यक्षात मात्र अजूनही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळत नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी लाडक्या बहिणींना जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल तेव्हा 2100 रुपये दिले जातील असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा योग्य वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्यास सुरुवात केली जाईल असे विधान केले आहे. पण आता महायुती सरकारमधील काही मंत्रीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देता येणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. मंत्री संजय शिरसाठ यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
काय म्हणतात मंत्री संजय शिरसाठ ?
मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या राज्यात शासकीय निधीचा मोठा तुटवडा आहे. ते म्हणालेत की, राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सुद्धा इतर विभागाचा निधी वळवावा लागला आहे.
तसेच मंत्री महोदयांनी त्यांच्या सामाजिक व आदिवासी विकास खात्याला पुरेसा निधी न मिळाल्याने संताप सुद्धा व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी वस्तुस्थिती मान्य करायला हवी असं म्हणत 1500 रुपयांचे 2100 रुपये दिले जाणार नाहीत, ते शक्य नाही असे सुद्धा यावेळी म्हटले आहे.
लाडक्या बहिणींची निराशा
मंत्री संजय शिरसाठ यांचे हे विधान पाहता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणे कठीण असल्याचे दिसते. यामुळे सरकारचे निवडणूक काळातील आश्वासन हा निवडणुकीचा जुमला होता की काय? असा प्रश्न उपस्थित करत लाडक्या बहिणीच्या माध्यमातून संताप व्यक्त होताना दिसतोय.
स्वतः सरकार मधील मंत्र्यांकडूनच लाडक्या बहिणींचा निधी वाढणार नसल्याचे सांगितले जात असल्याने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये मिळतील ही अपेक्षा आता सर्वसामान्यांना दुर सारावी लागू शकते.