Ladaki Bahin Yojana : डिसेंबर महिना संपत आला तरीही लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.
त्यामुळे राज्यभर महिलांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, आता या योजनेबाबत महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात जमा केला जाणार आहे. या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये थेट DBT द्वारे जमा होतील. त्यामुळे वर्षाअखेरीस महिलांना दिलासा मिळणार आहे.
यासोबतच, मकरसंक्रांतीपूर्वी महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळाल्यानंतर, डिसेंबर आणि जानेवारी हे दोन हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.
यामुळे १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात एकूण ४५०० रुपये जमा होऊ शकतात. सरकारकडून याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. मात्र, प्राथमिक छाननी आणि पडताळणीनंतर निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक अर्जांना बाद करण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असून, अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत.
दरम्यान, ई-केवायसी (eKYC) प्रक्रियेसंदर्भातही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सध्या यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, अजूनही लाखो महिलांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने, सरकारकडून या मुदतीला वाढ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार लवकरच याबाबत दिलासादायक निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकूणच, लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, मकरसंक्रांतीपूर्वी मिळणारे हप्ते महिलांसाठी मोठी खुशखबर ठरणार आहेत.