Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही सुमारे २६ लाख महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसल्याचे समोर आले असून, यामुळे राज्यभरात महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अनेक महिलांनी केवायसी वेळेत पूर्ण केली नाही, तर काही महिलांनी केवायसी करूनही त्यांचा लाभ थांबवण्यात आला.
सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे २६ लाख महिला अशा आहेत ज्यांनी केवायसी पूर्ण केली असतानाही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. यामुळे योजना पारदर्शकपणे राबवली जात आहे का, असा सवाल उपस्थित झाला होता.
या सर्व बाबींची दखल घेत सरकारने प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेतला आहे. केवायसीमुळे ज्यांचा लाभ बंद झाला आहे, अशा महिलांची सविस्तर यादी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे.
या यादीनुसार अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. संबंधित महिला खरोखरच योजनेस पात्र आहेत की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे.
सध्या अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी हे काम सुरू केले असून, त्या लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे, ओळख आणि वास्तव तपासणी करत आहेत.
पडताळणीदरम्यान काही त्रुटी किंवा अडचणी आढळल्यास महिलांनी घाबरून न जाता थेट आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पडताळणीनंतर पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे योजनेतील गोंधळ दूर होऊन पात्र महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













