Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेत चुकीची माहिती भरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तब्बल १ लाख ७३ हजार ४८० लाभार्थी महिला अडचणीत सापडल्या आहेत.
या महिलांचा जानेवारी महिन्याचा हप्ता सध्या होल्डवर ठेवण्यात आला असून, आता या सर्व प्रकरणांची गावनिहाय प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा महिला बालकल्याण विभागाला ई-केवायसीमध्ये अडचणी आलेल्या महिलांची सविस्तर यादी पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून तांत्रिक अज्ञानामुळे चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याचे समोर आले आहे.
अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, मोबाईल किंवा इंटरनेटविषयक मर्यादा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले. परिणामी, आतापर्यंत नियमितपणे हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला.
नाशिक जिल्ह्यातच १ लाख ७३ हजार ४८० महिलांच्या ई-केवायसीमध्ये चुका झाल्याची नोंद आहे. त्यामुळेच या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा निधी जमा झाला नसल्याचे सांगितले जात आहे.
राज्यभरात साधारणपणे २० ते २५ टक्के लाभार्थी महिलांकडून अशी चूक झाल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, जिल्हा महिला बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना गावनिहाय संबंधित लाडक्या बहिणींची माहिती तपासून पात्रता निश्चित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना थकित हप्त्यांचा लाभ देण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.













