Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत 50 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्या महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे.
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, 21 वर्षांपेक्षा कमी वय आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला, सरकारी कर्मचारी, कुटुंबात चार चाकी वाहन असणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील 50 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे.

एवढेच नाही तर एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेच्या तब्बल 14 लाख महिलांना पंधराशे रुपये ऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
कोणाला मिळणार पाचशे रुपयांचा लाभ ?
ज्या महिला किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना फक्त पाचशे रुपये प्रति महिना लाभ मिळणार आहे. खरे तर, किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्रातील सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि राज्यातील सरकारकडून 6,000 रुपये असे वार्षिक 12 हजार रुपये दिले जातात.
म्हणजे महिन्याला एक हजार रुपयांचा लाभ मिळतो. हेच कारण आहे की ज्या लाडक्या बहिणी किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत त्यांना आता फक्त महिन्याला पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. म्हणजे किसान सन्मान निधीचे 1,000 आणि लाडकी बहीण योजनेचे 500 असे एकूण 1500 रुपये त्यांना मिळणार आहेत.
वास्तविक, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती. मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर सोडा पण पंधराशे रुपये पण मिळत नाहीये तर अशी ओरड आता ऐकायला मिळत आहे.
जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत पात्र महिलांना एकूण 12 हप्ते मिळाले आहेत. जुलै 2024 ते जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला आहे.
विशेष म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता आहे. नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधीच या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांना दिला जाईल असे बोलले जात आहे.
आनंदाची बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील असाही दावा करण्यात आला आहे.