Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी झाली. खरे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली.
योजनेची घोषणा जून महिन्याच्या सुमारास करण्यात आली आणि याचा प्रत्यक्षात लाभ जुलै महिन्यापासून मिळू लागला. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले तर आम्ही पंधराशे रुपये नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारमधील मंत्र्यांनी केली होती.

आता महायुतीचे सरकार स्थापित होऊन अनेक दिवस उलटले आहेत मात्र तरीही 2100 रुपयांबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. महायुती मधील अनेक दिग्गज मंत्र्यांनी निवडणुकी प्रचाराच्या दरम्यान 2100 रुपयांबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. सरकार आल्याबरोबर महिलांना 2100 रुपये मिळतील अशी घोषणा मंत्र्यांकडून देण्यात आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा 2100 रुपयांची घोषणा केली होती. मात्र आता महायुतीचे सरकार स्थापित झाल्यानंतर महायुती मधील मंत्र्यांचा टोन पूर्णपणे चेंज झाला असून त्यांनी 2100 रुपयांवरून सपशेल घुमजाव केले असल्याचे दिसते.
खरे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून, बजेट पाहून 2100 रुपयां बाबतचा सकारात्मक निर्णय होईल असे नुकतेच म्हटले होते. अजित दादांच्या या वक्तव्याला फार जास्त दिवसही झालेले नाहीत. असे असतानाच आता महायुतीमधील अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलेलं नाही असं विधान करत घूमजावं केला आहे.
एवढेच नाही तर झिरवाळ यांनी यासंदर्भात पुढे बोलताना विरोधकांनीच 2100 रुपयांवर जोर लावलाय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुरेसे आहेत, या पैशांमध्ये त्या खूश आहेत, असे सुद्धा म्हटले आहे. एकंदरीत झिरवळ यांनी 2100 रुपये देण्यावरुन पलटी मारल्याचं दिसून येत आहे पण झिरवळ यांच्या या विधानानंतर लाडक्या बहिणी कमालीच्या दुखावल्या गेल्या आहेत.
दरम्यान झिरवळ यांच्या या विधानानंतर खरंच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार नाही का? अशी विचारणा आता महिलांकडून होत आहे. यामुळे आता यासंदर्भात सरकारकडून नेमका काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या नऊ महिन्याचा लाभ मिळाला असून लवकरच महिलांना एप्रिल महिन्याचा पैसा दिला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिना संपण्याच्या आधीच महिलांना दहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचे पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.