LIC Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच उतारवयात आपल्यालाही पेन्शन मिळावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी एलआयसीची एक पेन्शन योजना फायद्याची ठरणार आहे. खरे तर अलीकडे सर्वसामान्यांसाठी शेकडो पेन्शन योजना सुरू झाल्या आहेत. पण यातील बहुतांशी पेन्शन योजनांमध्ये कित्येक वर्ष प्रीमियम भरावा लागतो.
मात्र एलआयसीने एक अशी योजना आणली आहे ज्यामध्ये ग्राहकांना फक्त एकदा प्रीमियम भरावा लागतो आणि त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते. विशेष म्हणजे पेन्शन कधी सुरू झाली पाहिजे आणि किती पेन्शन मिळायला हवी हे सर्वस्वी ग्राहकांवर असते. या योजनेत तीस वर्षानंतर गुंतवणूक करता येते आणि वयाच्या तिसाव्या वर्षानंतर कधीही पेन्शन सुरू करता येते.

ही स्कीम अशा व्यक्तींसाठी फायद्याची ठरणार आहे ज्यांना तिसाव्या वर्षानंतर लगेचच पेन्शन हवी असते. विशेष म्हणजे यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांना हवी तेवढी रक्कम गुंतवता येते. म्हणजे गुंतवणूकदारांना जेवढी पेन्शन हवी आहे त्यानुसार ते यामध्ये प्रीमियम भरू शकतात. अनेकांना रिटायरमेंटच्या वेळी मोठा पैसा मिळतो आणि असे लोक या योजनेत पैसे गुंतवून नक्कीच आपले उर्वरित आयुष्य सुखात घालू शकणार आहेत.
कोणती आहे ती योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे न्यू जीवन शांती योजना. ही न्यू जीवन शांती योजना एक डेफर्ड एन्युटी म्हणजेच पेन्शन योजना आहे, ज्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतात. म्हणजे या योजनेतून जर तुम्हाला पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावे लागणार आहे. यानंतर, एलआयसी तुम्हाला आयुष्यभर पेन्शन देणार आहे.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेप्रमाणे पेन्शन कधी सुरू झाली पाहिजे हे ठरवता येणार आहे. जर समजा आज एखाद्या ग्राहकाने ही न्यू जीवन शांती योजना घेतली तर त्याला एक वर्षात पेन्शन हवी आहे, दोन वर्षात हवी आहे की पाच वर्षात हवी आहे हे ठरवता येणार आहे.
पण जेवढ्या उशिराने तुम्ही पेन्शन सुरू करणार तेवढाच अधिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. ही पेन्शन योजना 30 ते 79 वर्ष वयोगटातील नागरिकांना खरेदी करता येणार आहे. जर समजा तुम्ही तुमच्या वयाच्या तिसाव्या वर्षी ही योजना खरेदी केली आणि डेफरमेंट पिरीयड दोन वर्ष, चार वर्षे किंवा पाच वर्ष सेट केला तर तुम्हाला तुमच्या वयाच्या 32 34 किंवा 35 वर्षानंतर प्रत्यक्षात पेन्शन मिळणार आहे.
पेन्शन योजनेचे दोन प्लॅन आहेत
न्यू जीवन पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे सिंगल लाईफ आणि दुसरा म्हणजे जॉईंट लाइफ. जर तुम्ही सिंगल लाईफ प्लॅनमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचा डेफरमेंट पिरीयड पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळणार आहे आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम तुमच्या नॉमिनीला दिला जाणार आहे.
पण जर तुम्ही जॉईंट लाइफ स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचा डेफरमेंट पिरीयड पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळणार आहे आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही जॉईन केलेल्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या प्लॅनमधील दोघांचा मृत्यू झाला तर अशा प्रकरणात नॉमिनीला गुंतवलेली रक्कम परत केली जाते.
किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते
या योजनेत किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे कमाल गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्यात आलेले नाही म्हणजेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्याला जेवढा प्रीमियम भरायचा आहे तेवढा तो भरू शकतो. जर समजा या पेन्शन स्कीम मध्ये दीड लाखाची गुंतवणूक केली तर वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळते.
ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर जर तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. या पॉलिसीमध्ये तुम्हाला कर्जाची देखील सुविधा उपलब्ध होते. जर तुम्ही तुमच्या वयाच्या 45 व्या वर्षी सिंगल लाईफ प्लान दहा लाख रुपयांना खरेदी केला आणि डेफरमेंट पीरियड पाच वर्षांचा ठेवला तर डेफरमेंट पिरियड पूर्ण झाल्यानंतर तर तुम्हाला वार्षिक 89,400 रुपये पेन्शन मिळणार आहेत.
पण जर तुम्ही सहामाही पेन्शनचा पर्याय निवडला तर तुम्हाला 43806 रुपये मिळणार आहेत. त्रिमासिक पेन्शनचा पर्याय निवडला तर तुम्हाला 21,680 रुपये आणि मासिक पेन्शन चा पर्याय निवडला तर 7152 रुपये मिळणार आहेत.