Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने तडाका दिला आहे. मुसळधार पावसाच्या दणक्याने काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने तिथे मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने मोसमी पावसा संदर्भात एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. या नवीन अंदाजात हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र या पाच पैकी दोन दिवस म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.
शुक्रवारपासून मात्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होणार आहे. दरम्यान, आता आपण आज आणि उद्या राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
24 जुलै : आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशीच परिस्थिती मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. यामुळे या चार जिल्ह्यांना आज रेड अलर्ट मिळाला आहे. तसेच उर्वरित कोकण, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव येथे जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यासाठी मात्र कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही. परंतु उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे.
25 जुलै : उद्या 25 जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्याचं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. पण सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो असेही आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.