Loan EMI Alert : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज घेतले असेल तसेच काहीजण आगामी काळात कर्ज घेण्याच्या तयारीत असतील. आपण सर्वजण विविध कारणांसाठी कर्ज घेत असतो. घरासाठी, कार खरेदी करण्यासाठी किंवा मग आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज घेतो. मात्र कर्ज घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
अनेकजण पहिल्यांदाच कर्ज घेतात आणि त्यांना कर्जाबाबतची फारशी माहिती नसते अशावेळी मग कर्जदारांची कोंडी होत असते. कर्जदाराला कर्जाबाबत जसे की कर्ज परतफेडी बाबत, व्याजदराबाबत तसेच इतर छुपे चार्जेस बाबत माहिती नसते आणि मग कर्जदाराला कर्ज महागात पडते.
माहिती नसल्याकारणाने कर्जदाराच्या हातून कर्ज घेताना काही चुका होतात आणि याचा फटका कर्जदाराला भविष्यात सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण कर्ज घेताना कोणत्या पाच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
कर्ज घेताना या गोष्टींची काळजी घ्या
क्रेडिट स्कोर चांगला ठेवा : तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असायला हवा. क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. याच क्रेडिट स्कोर च्या आधारावर बँकां कर्ज मंजूर करत असतात. ज्या लोकांचा क्रेडिट स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून सहजतेने कर्ज मिळते. तसेच चांगला क्रेडिट स्कोर असणाऱ्या लोकांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.
यामुळे कर्ज घेताना तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे ही गोष्ट विशेष मॅटर करते. म्हणून तुमचा क्रेडिट स्कोर कमी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. क्रेडिट स्कोर कमी होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जर ईएमआय वर एखादी वस्तू खरेदी केली असेल तर त्याचे हप्ते तुम्हाला वेळेवर भरायचे आहेत. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरायची आहेत.
EMI कमी असावा : कर्ज घेताना ईएमआय हा नेहमीच कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला महिन्याला मिळणारा पगार आणि महिन्याला तुम्हाला खर्चासाठी लागणारे पैसे याव्यतिरिक्त मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखान्यासारख्या इमर्जन्सीच्या वेळी लागणाऱ्या पैशांचा हिशोब करूनच तुम्ही ईएमआय ठरवला पाहिजे. पण ईएमआय कमी केल्यास कर्ज फेडण्याचा कालावधी वाढतो हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे.
कर्जाची रक्कम आणि कर्जफेडीचा कालावधी : तुम्हाला जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढ्याच पैशांचे कर्ज घ्या विनाकारण अतिरिक्त कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. कमी कर्ज घेतले तर ते कर्ज लवकरात लवकर निल होते. दुसरीकडे कर्जफेडीचा कालावधी देखील तुमच्या आर्थिक खर्चाचे नियोजन करून ठरवले गेले पाहिजे. जर कर्ज परतफेडीचा कालावधी अधिकचा असेल तर तुम्हाला साहजिकच अधिकचे व्याज भरावे लागणार आहे पण अशा परिस्थितीत तुमचा ईएमआय चा हप्ता कमी राहील.
व्याजदराची तुलना अवश्य करा : अनेकजण कर्ज घेतात पण बँकेकडून कर्ज मिळतंय म्हणून व्याजदराची तुलना न करता कर्ज घेतले जाते. मात्र कर्ज घेताना व्याजदराची तुलना अवश्य केली पाहिजे. ज्या बँका किंवा वित्तीय संस्था कमी व्याजदरात कर्ज देतात आणि जिथे इतर चार्जेस कमी आहेत अशा ठिकाणाहून कर्ज घेणे कधीही फायद्याचे ठरते.