Maharashtra Assembly Election News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलाय. हा निकाल महायुतीसाठी उत्साहवर्धक राहिला तर महाविकास आघाडीसाठी खूपच निराशा जनक. या निकालाने राजकारणातील अनेक राजकीय विश्लेषकांचे देखील गणिते फोल ठरवलीत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले. महत्त्वाची बाब अशी की या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते सुद्धा या निवडणुकीत पराभूत झालेत.
![Maharashtra Assembly Election News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/12/Maharashtra-Assembly-Election-News.jpeg)
यामुळे या निकालावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते निकालावर शंका उपस्थित करत आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी EVM वर पराभवाचे खापर फोडले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील निकालावर संशय घेतलाय.
दरम्यान आज शरद पवार यांनी यासंदर्भात बोलताना एक विस्तृत आकडेवारी सादर केली आणि निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. अशा परिस्थितीत आज आपण शरद पवार साहेबांनी नेमके काय म्हटले आहे, त्यांनी नेमकी कशाची आकडेवारी मांडली आहे याचा आढावा घेणार आहोत.
शरद पवारांनी मांडली मतांची आकडेवारी
शरद पवार यांनी राज्यात निवडणुका झाल्यात की उत्साहाचे वातावरण असतं मात्र यावेळी तसे उत्साहाचं वातावरण कुठेच पाहायला मिळत नसल्याचे म्हटले. मात्र उगीच आरोप करता येणार नाही कारण की माझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये.
मात्र मी प्रत्येक राजकीय पक्षाला किती मते पडली आणि किती लोक निवडून आलेत याची एक आकडेवारी काढली आहे. यानुसार, काँग्रेसला राज्यात ८० लाख मते मिळालीत आणि काँग्रेसचे १५ लोक निवडून आलेत. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना ७९ लाख मते मिळाली म्हणजे काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडलीत पण, त्यांचे ५७ लोक निवडून आलेत.
म्हणजे ८० लाख वाल्यांचे १५ आणि ७९ लाख वाल्यांचे ५७ लोक निवडून आलीत. शरद पवार गटाचे ७२ लाख मते आहेत अन आमचे उमेदवार निवडून आलेत १०. दुसरीकडे अजित पवार गटाचे ५८ लाख मते आहेत त्यांचे ४१ लोक निवडुन आलेत.
७२ लाखांचे १० आणि ५८ लाखवाल्यांचे ४१ लोक कसं निवडून आलेत असा प्रश्न शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. हे काही तरी आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढलीये.
पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. मात्र मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते म्हणालेत की, हरियाणात भाजपाची परिस्थिती बिकट होती मात्र तिथे भाजपाची सत्ता आली अन जम्मू काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्ला यांचे सरकार आले.
दरम्यान महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला यश आले आणि झारखंडमध्ये भाजपाचा पराभव झाला. याचा अर्थ छोटी राज्य आहेत तिथे आम्ही आणि मोठी राज्य आहेत तिथे भाजप सत्तेवर येत आहे, असं म्हणतं शरद पवार साहेबांनी निवडणुकांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
यामुळे आता या संदर्भात महाविकास आघाडी कडून पुढे काय भूमिका घेतली जाणार? महाविकास आघाडी कायदेशीर मार्गाने याप्रकरणी पाठपुरावा करणार का? या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.