Maharashtra Bullet Train : सध्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून याच दरम्यान आता महाराष्ट्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यानही बुलेट ट्रेन धावणार आहे.
सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केंद्राचे हिवाळी अधिवेशन सुरू असून याच हिवाळी अधिवेशनात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूर-मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचेही काम केले जाणार अशी माहिती संसदेला दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पहिली हायस्पीड ट्रेन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास जलद होईल. ताशी 320 ते 350 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे 508 किमीचे अंतर अवघ्या 2 ते 2.30 तासांत पूर्ण करेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
तसेच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 12 बुलेट ट्रेन स्थानक विकसित केले जाणार असून या स्थानकांची रूपरेषा सुद्धा पूर्णपणे तयार करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिलीये.
विशेष बाब अशी की, भारतातील या पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नंतर दुसरा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट देखील आपल्या महाराष्ट्रालाच मिळणार अशी माहितीही त्यांनी यावेळी सभागृहाला दिली आहे.
या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर नागपूर-मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचेही काम केले जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या प्रस्तावित मार्गाचा अन्य 7 मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन सुरू झाल्यास या दोन्ही शहरात दरम्यानचा प्रवास हा फारच वेगवान होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भातील उद्योग वाढीसाठी बुलेट ट्रेन फायद्याची ठरेल असा विश्वास सरकारकडून व्यक्त होत आहे.