PM Kusum Yojana : शेतकऱ्यांना दिवसा आतापर्यंत बसवले ७२ हजार सौर कृषीपंप सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम कुसुम योजना’ राबवण्यात येत आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून, आजपर्यंत ७१ हजार ९५८ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहे. राज्य सरकारने २०२० मध्ये २०२५ पर्यंत राज्यात ५ लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान म्हणजेच ‘कुसुम’ ही योजना २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी राबवत आहे. या योजनेत राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता दिली आहे.
देशात यापैकी एकूण २ लाख ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषी पंप महाराष्ट्रामध्ये महाऊर्जामार्फत बसवण्यात आले आहेत. पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठवणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरण्याची सुविधा देणे, पुरवठादार निवडण्याचे शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.
महाऊर्जाकडे उर्वरित १ लाख २५ हजार सौर पंपाचे उद्दिष्टास अनुसरून राज्यात शेतकऱ्यांकडून ८ लाख ७४ हजार ९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार ८२३ जणांना मान्यता देण्यात आली आहे.
त्यापैकी ९४ हजार ९१९ जणांना एसएमएस पाठवण्यात आले आहे. ८३ हजार ४८० शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला असून, त्यातील ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित झाले आहेत. त्यामुळे महाऊर्जाने ११ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाकडे पुढील १ लाख ८० हजार सौर पंपाचे अधिक उद्दिष्टाची मागणीदेखील केली आहे.