Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते विकासाचे काम पूर्ण झाले आहे. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक मोठमोठे महामार्ग सुद्धा डेव्हलप झाले आहेत. तसेच काही प्रकल्पांचे काम अजूनही सुरूच आहे. दरम्यान आगामी काळात काही नव्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत.
अशातच आता मुंबई अन ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे ते बोरिवली या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या भागात एक नवा भुयारी मार्ग डेव्हलप केला जाणार आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक आहे. दरम्यान याच ठाणे-बोरिवली बोगदा मार्गाबाबत आता एक आशादायी चित्र तयार झाले आहे. या प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प भूसंपादन व इतर काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता.
मात्र आता या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे अन इतर बाकीच्या तांत्रिक अडचणी देखील आता निकाली निघाल्या आहेत. खरेतर, मागाठाणे येथील 87 झोपडपट्टीतील कुटुंबांचे पुनर्वसन करणे हे या प्रकल्पातील सर्वात मोठे चॅलेंज होते आणि अखेरकार आता संबंधित झोपडीपट्टीतील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यास शासनाला यश आले आहे.
स्थानिक आमदार प्रकाश सूर्ये, उपजिल्हाधिकारी रोहिणी फडतरे आणि पंकज सोनवणे यांच्या उपस्थितीत या पुनर्वसित कुटुंबांना घरांची चावी देण्यात आली आहे. यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या प्रकल्पाची सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा भुयारी मार्ग विकसित झाल्यामुळे काय फायदे होणार, यासाठी किती खर्च होणार, तसेच हा भुयारी मार्ग प्रकल्प नेमका कसा असणार? याचा रूट कसा असेल? याच साऱ्या मुद्द्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत.
कसा असणार प्रकल्प ?
ठाणे ते बोरिवली दरम्यान जो भुयारी मार्ग विकसित केला जात आहे त्यासाठी सुमारे 18,838 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्याच्या वाहतूक व्यवस्थेनुसार ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास पूर्ण करायचे झाले तर प्रवाशांना दोन तास लागतात.
मात्र हा नवा भुयारी मार्ग अर्थात बोगद्याचा प्रकल्प पूर्णपणे रेडी झाला तर ठाणे ते बोरिवली हा प्रवास कालावधी अवघ्या वीस मिनिटांवर येणार आहे. या भुयारी मार्ग प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर याचे एकूण लांबी 11.85 किमी इतकी असून या मार्गामध्ये 10.25 किमीचा बोगदा विकसित केला जाणार आहे.
या भुयारी मार्ग प्रकल्प अंतर्गत सहा लेनचा दुहेरी मार्ग विकसित होणार असून यामुळे या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रकल्प या परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार असून यामुळे या भागाचा एकात्मिक विकास सुनिश्चित होईल अशी आशा आहे.
या प्रकल्पाच्या फायद्याबाबत बोलायचं झालं तर यामुळे घोडबंदर रोडवरील प्रचंड वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. खरेतर, या प्रकल्पाची पायाभरणी अर्थातच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.
दरम्यान या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा म्हणजेच पुनर्वसनाचा अडथळा दूर झाला असून आता येत्या काही आठवड्यात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असून हा प्रकल्प मुंबईच्या नागरी विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेतच पूर्ण व्हावे अशी येथील नागरिकांची इच्छा आहे.