Maharashtra Expressway : राज्यातील दळणवळण व्यवस्था अलीकडे फारच मजबूत झालीये. मागील पंधरा-वीस वर्षांच्या काळात नवनवीन महामार्ग विकसित झालेत.
जळगाव जिल्ह्यात देखील रस्त्यांचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. भविष्यात जिल्ह्याला आणखी एका नव्या रस्त्याची भेट मिळू शकते. जळगाव – इंदोर असा एक शॉर्टकट रस्ता प्रस्तावित आहे.

भविष्यात हा प्रकल्प तयार झाला तर नागरिकांना जलद गतीने इंदोरला जाता येईल. जळगावहून इंदोरला जाण्यासाठी आधीच दोन महामार्ग आहेत. यात रावेर – बऱ्हाणपूर व चोपडा ते शेंदवा या मार्गाचा यात समावेश आहे.
मात्र या दोन्ही मार्गांमुळे प्रवाशांना फेरा मारावा लागतो. यामुळे जळगाव ते इंदोर दरम्यान शॉर्टकट मार्ग अस्तित्वात यायला हवा अशी मागणी उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून किनगाव- लंगडा आंबा-सिरवेल-खरगोन मार्गे थेट इंदूरला जोडणारा असा एक नवीन मार्गाचा पर्याय पुढे आला होता.
हा शॉर्टकट रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. मात्र प्रत्यक्षात याचे काम काही होत नाहीये. अजूनही हा रस्ता फक्त कागदावरच दिसतो. त्यामुळे या रस्त्याचा प्रस्ताव तातडीने मार्गी लागला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिरवेल मार्गे मधला रस्ता तयार झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. तसेच इंधन बचत देखील होणार आहे. हा नवीन शॉर्टकट मार्ग झाला तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
नवा रस्ता कसा असेल?
जळगाव – ममुराबाद – विदगाव – डांभूर्णी- किनगाव- वाघझिरा – लंगडा आंबा असा हा रूट प्रस्तावित करण्यात आला आहे. हा राज्यमार्गाचा प्रस्ताव तयार करून त्यास 186 क्रमांक सुद्धा देण्यात आला होता.
सध्या हा रस्ता लंगडा आंबा पर्यंत कच्चा आहे. मात्र लंगडा आंबा च्या पुढे सिरवेल पर्यंतचा रस्ता आधीच तयार असून येथे फक्त दोन्ही राज्यांच्या सीमेवर एक पुलाचे बांधकाम करावे लागणार आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यात किनगाव ते वाघझिरा हा पण रस्ता तयार झालेला आहे. परंतु वाघझिरा ते लंगडा आंबा हा मार्ग विकसित करावा लागणार आहे.













