Maharashtra Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग म्हणजे 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण महामार्ग आता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
दुसरीकडे आता याच समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. या अंतर्गत नागपूर ते गोंदिया दरम्यान नवीन एक्सप्रेस वे विकसित होणार असून हा देखील एक प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल. याच प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाबाबत आता एक नवीन माहिती समोर येत आहे.

काय आहे नवीन अपडेट ?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर – गोंदिया प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. आता या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सर्वात कमी बोली लावलेल्या म्हणजेच लोवेस्ट बिडर ठरणाऱ्या कंत्राटदारांशी यशस्वी वाटाघाटी सुद्धा पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच याचे सुधारित अंदाजपत्रक राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले असून फडणवीस सरकारकडून याला मंजुरी मिळाल्यानंतर या महामार्ग प्रकल्पासाठी प्रत्यक्षात वर्क ऑर्डर दिले जाणार आहेत.
या प्रकल्पातील सर्व पॅकेजेससाठी येत्या काही दिवसांनी वर्क ऑर्डर म्हणजे कामगिरी आदेश जारी करण्यात येणार आहेत. या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा महामार्ग या महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड महामार्गामुळे विदर्भातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
नागपूर आणि गोंदिया यांच्यातील प्रवासाचा वेळ या प्रस्तावित महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रादेशिक विकासालाही गती मिळणार आहे.
कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठीच्या पॅकेज NG01 व NG02 साठी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे.
तसेच पॅकेज NG03 व NG04 साठी एनसीसी (NCC) व पॅकेज NG2A साठी पटेल इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम संबंधित बांधकाम कंपन्यांना मिळणे अपेक्षित असून या कंपन्यांना लवकरच वर्क ऑर्डर मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर-भंडारा-गोंदिया मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हा महामार्ग प्रामुख्याने विदर्भासाठी गेम चेंजर ठरणार आहे.