Maharashtra Expressway : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्गावर आता हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. खरेतर, भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातो.
देशातील सर्वात लांब आणि अत्याधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाणारा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातून जाणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. या प्रकल्पामुळे मुंबई – दिल्ली प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.

हा मार्ग सध्या स्थितीला अंशतः खुला आहे आणि नजीकच्या भविष्यात पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी ओपन होणार आहे. आता याच दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेचा प्रवास अनुभव आणखी आधुनिक आणि सुरक्षित बनवण्यात आला आहे.
1386 किमी लांबीचा आणि 8 लेनचा हा द्रुतगती मार्ग दिल्ली–मुंबई प्रवास निम्म्याने कमी होणार अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे 24 तासांचा प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण होणार आहे.
आता या एक्सप्रेसवेवर प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली असून, अपघाताच्या परिस्थितीत जलद वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही सुविधा बुक युअर हेलिकॉप्टर कंपनीद्वारे चालवली जात असून, अपघातग्रस्तांना त्वरित रुग्णालयात हलवणे शक्य होणार आहे.
दररोज हजारो वाहने या एक्सप्रेसवेवरून प्रवास करतात. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिकेला पोहोचण्यास वेळ लागत असल्याने, हेलिकॉप्टर सेवा हा जीव वाचवणारा एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
या सेवेसाठी अलवर जिल्ह्यातील पिनान रेस्ट एरियापासून 125 किमी अंतरावर असलेल्या हेलिपॅडवरून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच या सेवेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो राजस्थान पर्यटन विभागाच्या सहकार्याने राबवला जाणार आहे.
या टप्प्यात सरिस्का अभयारण्य, अरवली पर्वतरांगा, ऐतिहासिक किल्ले आणि प्रमुख पर्यटन स्थळे यांना जॉय राईड्स आणि एरियल टूरद्वारे जोडले जाणार आहे. पर्यटकांसाठी हा एक नवा पर्यटन अनुभव ठरणार आहे.
एक्सप्रेसवेचे अनेक टप्पे आता पूर्णत्वास येत असून, नेहरू बंदर, भरूच-सुरत, सुरत-विरार-मुंबई, मध्य प्रदेश-गुजरात सीमा आणि सवाई माधोपूर-झालावाड हे विभाग लवकरच जनतेसाठी खुले होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या एक्सप्रेसवेचे दिल्ली-दौसा-सवाई माधोपूर (293 किमी) आणि झालावाड-रतलाम-एमपी/गुजरात सीमा (245 किमी) हे दोन टप्पे कार्यरत आहेत. विशेषतः दिल्ली-दौसा-लालसोट या 246 किमीच्या विभागाचा विकास 12,150 कोटी रुपये खर्चून करण्यात आला आहे. या मार्गाच्या सुरूवातीमुळे दिल्ली–जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांवरून 3.5 तासांवर कमी झाला आहे.
भारताची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा हा महामार्ग केवळ देशातील सर्वात मोठा नसून, जगातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर सेवेच्या सुरुवातीमुळे या एक्सप्रेसवेची सुरक्षितता आणि सोयीसुविधा आणखी मजबूत झाल्या आहेत.













