Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही मोठ्या प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. असाच एक मोठा प्रकल्प आहे समृद्धी महामार्गाचा. मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे.
हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाचे नागपूर ते इगतपुरी यादरम्यानचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावरून वाहतूक देखील सुरू आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचे तीन टप्पे वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत.
नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले होते. यानंतर भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.
याचे लोकार्पण मार्च महिन्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी केले. दरम्यान आता या महामार्गाचा चौथा टप्पा देखील वाहतुकीसाठी सुरू होण्यास सज्ज झाला आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा चौथा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबर महिन्यात हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी समृद्धी महामार्ग संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे पहिले हेलीपॅड बांधून तयार झाले आहे. म्हणजेच या ठिकाणी आता हेलिकॉप्टर सुद्धा उतरू शकणार आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये जलद मदतीसाठी या हेलिपॅड चा उपयोग केला जाणार आहे.
विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर सहा ठिकाणी हेलीपॅड तयार होणार आहेत. यातील इगतपुरी येथील बोगद्याच्या सुरुवातीलाच हेलिपॅड बांधून तयार झाले आहे. या महामार्गावर प्रत्येक शंभर किलोमीटरवर एक हेलिपॅड विकसित करावेत असे निर्देश केंद्रातील सरकारने दिले होते.
त्यानुसार राज्य शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. इगतपुरी, शिर्डी, वर्धा, बुलढाणा, जालना आणि भिवंडी या ठिकाणी हेलिपॅड तयार होणार आहेत. येथून सर्व प्रकारच्या हेलिकॉप्टर्सला लँडिंग आणि टेकऑफची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यामुळे मेडिकल इमर्जन्सी मध्ये मोठी मदत होईल अशी आशा आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे नक्कीच मुंबई ते नागपूरचा प्रवास सुरक्षित होणार आहे.