Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील विविध भागात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अजूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जनतेला लवकरच एका नव्या राष्ट्रीय महामार्गाची भेट मिळणार आहे.
एका राज्य महामार्गाचे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गात होणार असून यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असे बोलले जात आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या महामार्गाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. या महामार्गासाठी आमदार अमरीश पटेल यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

पटेल यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी गडकरी यांची यासंदर्भात भेट घेतली आणि या भेटीत गडकरी यांनी या महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आणि मी स्वतः शिरपूर येथे येऊन या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पटेल यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की अडीच तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन.एच.ए.आय.) कडे ट्रान्सफर करण्याबाबत कार्यवाहीचे काम झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र शासनाच्या परिवहन खात्याला “ना हरकत प्रमाणपत्र” (एन.ओ.सी.) दिले होते.
यामुळे आता हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग होणार आहे अन आता या मार्गाचे चौपदरीकरणं होणार असून या भागातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या रोड मॅप बाबत बोलायचं झालं तर हा रस्ता अंकलेश्वर पासून तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर असा राहणार आहे.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर हा राज्य मार्ग-4 आता राष्ट्रीय महामार्ग “एन एच-753 बी” होणार आहे. हा रस्ता चाचपदरी झाल्यानंतर या महामार्गावर विविध सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे अंकलेश्वर ते नागपूर या दरम्यानच्या प्रवासामधील शंभर किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.
यामुळे अंकलेश्वर ते नागपूर असा प्रवास वेगवान होईल अशी आहे. या मार्गाचा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. तथापि या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण झाले पाहिजे अशी मागणी उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जनतेकडून करण्यात आली आहे.