पुण्याला मिळणार 12,000 कोटी रुपयांचा महामार्ग ! 135 किमीच्या रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 12 हजार कोटी रुपयांचा चारपदरी महामार्ग प्रस्तावित केला आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते मराठवाडा आणि मराठवाडा ते मुंबई या दरम्यान चा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

Published on -

Maharashtra Expressway News : राज्यातील मुंबई पुणे नागपूर नाशिक सारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 12 हजार कोटी रुपयांचा चारपदरी महामार्ग प्रस्तावित केला आहे. हा महामार्ग प्रकल्प 135 किलोमीटर लांबीचा राहणार असून हा महामार्ग शिरूर, चाकण, तळेगाव, शिरोली, कर्जत आणि जेएनपीटी (उरण) या भागाला जोडला जाणार आहे.

या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते मराठवाडा आणि मराठवाडा ते मुंबई या दरम्यान चा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. मात्र, सद्यस्थितीत हा प्रस्ताव पुनरावलोकनाच्या टप्प्यात असून अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाकडून या प्रस्तावाला कधी मान्यता मिळते हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

नवीन महामार्गामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक भार असलेल्या शिक्रापूर-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गावरील दडपण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खरेतर, चाकण आणि शिरूर येथे असणारी एमआयडीसी फारच मोठी आहे. यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते.

वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होतात. पण, हा प्रस्तावित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, हा मार्ग मुंबईकडे जाण्यासाठी सरळ व वेगवान पर्याय उपलब्ध करून देईल, त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल.

PWD चे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांच्या मते, हा महामार्ग वडोदरा जवळील राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार असून या महामार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जेएनपीटीपर्यंत अखंडित संपर्क साधला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी अंदाजे 11 हजार 500 कोटी रुपये खर्च करावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच या महामार्गाच्या बांधकामासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर (BOT) पद्धतीने विकसित केला जाणार असून यामध्ये चार पदरी रस्ता, आठ ठिकाणी बायपास आणि खंडाळा घाटात एक बोगदा तयार करण्यात येणार आहे.

अमृतांजन ब्रिजप्रमाणे हा बोगदा सुलभ उतारासह बांधला जाणार आहे, ज्यामुळे वाहतूक अधिक गतीमान होईल. अधिकाऱ्यांच्या मते, हा महामार्ग सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी जवळपास 80% कमी होईल. राज्य मंत्रिमंडळाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, जमीन अधिग्रहणासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल आणि त्यानंतर दीड ते दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होईल.

सद्यस्थितीत हा प्रस्ताव राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पायाभूत सुविधा समिती त्याचा आढावा घेत आहे. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्ग हा प्रमुख दुवा आहे.

औद्योगिक वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नवीन महामार्गामुळे शिरूर, चाकण, तळेगाव, शिरोली, कर्जत आणि जेएनपीटी या मार्गावर पर्यायी दुवा निर्माण होईल, ज्यामुळे पनवेल आणि उरणकडेही सहज संपर्क साधता येईल. जेएनपीटी हा देशातील एक महत्त्वाचा व्यापार आणि लॉजिस्टिक केंद्र असल्याने हा महामार्ग त्याच्या विकासाला हातभार लावेल.

नवीन महामार्गामुळे केवळ वाहतूक सुधारणा होणार नाही, तर शिरूर, तळेगाव आणि कर्जत भागातील उद्योगांना चांगला फायदा होईल. तसेच शेती व्यवसायालाही उन्नती मिळेल, कारण शेती उत्पादनांची वाहतूक अधिक सुलभ होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जड वाहतूक कमी झाल्याने शहरी वाहतूक व्यवस्थापन अधिक सुकर होईल आणि प्रवाशांचा प्रवासकालावधीही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

या महामार्गाचे बांधकाम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 60 किलोमीटरचा भाग पूर्ण करण्यात येईल, ज्यामध्ये सर्वाधिक वाहतूक भार असलेल्या मार्गांवर भर दिला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 75 किलोमीटरचा भाग पूर्ण करून शिरूर ते जेएनपीटी दरम्यान अखंड वाहतूक दुवा निर्माण केला जाईल.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो वाहतूक, उद्योग आणि व्यापाऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल आणि पुणे-पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे. नक्कीच हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला देखील चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe