Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या जी वाहतूक कोंडी होत आहे ती कोंडी लवकरच फुटणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाच्या विस्ताराचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी तयार करण्यात आलेला हा महामार्ग 2002 मध्ये सुरु झाला.
94.2 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग प्रकल्प त्यावेळी पुरेसा होता मात्र आता या महामार्गावर वाहनांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे आणि यामुळे हा महामार्ग आता अपुरा पडतोय. महत्वाचे म्हणजे भविष्यात या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या आणखी भीषण बनण्याची शक्यता आहे.
यामुळे आता राज्य रस्ते विकास महामंडळाने या सहा पदरी महामार्गाचा विस्तार करून आठ पदरी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा महामार्ग आठपदरी केला जाईल अन मुंबई आणि पुण्याच्या दिशेने प्रत्येकी एक लेन ऍड केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाचे आठपदरीकरण करायचे ठरवले. फेब्रुवारी २०२४ मध्ये एमएसआरडीसीने आठपदरीकरणाचे काम सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठवला. पण त्या प्रस्तावाची मंजुरी न मिळाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.
या प्रकल्पासाठी जवळपास 6 हजार 80 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या महामार्गाचे काम सुरु करण्यासाठी लागणाऱ्या निधी उभारण्याबाबतचे दोन पर्याय राज्य सरकारसमोर ठेवण्यात आले आहेत.
त्यातील पहिला पर्याय म्हणजे राज्य सरकारने अर्थ संकल्पात तरतूद करुन निधी उपलब्ध करुन द्यावा. तर दुसरा पर्याय हा ‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसूलीची कालमर्यादा वाढवून द्यावा’, असा आहे.
यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितलेल्या या दोन पैकी कोणता पर्याय सरकार स्वीकारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आता या प्रकल्पाला सरकारकडून कधीपर्यंत मंजुरी मिळणार आणि याचे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार? मुंबई आणि पुणेकरांना याचीच प्रतीक्षा लागलेली आहे.