Maharashtra Expressway News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सध्या या महामार्ग प्रकल्पाचा नागपूर ते इगतपुरी असा 625 km लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. दरम्यान इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम 10 मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर गुढीपाडवा पर्यंत हा महामार्ग प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा अंदाज आहे.
महत्त्वाचे म्हणजे समृद्धी महामार्गाचा विस्तार सुद्धा केला जाणार आहे. या महामार्गाचा विस्तार म्हणून जालना ते नांदेड दरम्यान नवा महामार्ग तयार केला जाणार असून आता याच जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्प बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी हा महामार्ग प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो असे म्हटले आहे अन यामुळे आता या महामार्ग प्रकल्पाबाबत नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खरे तर हा महामार्ग प्रकल्प गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रस्तावित करण्यात आला होता.
हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून ते सध्या भाजपामध्ये आहेत. अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले होते आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना हाती घेत नागपूर ते मुंंबई समृद्धी महामार्गाला नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांसह हिंगोलीचा काही भाग जोडण्यासाठी या महामार्गाची आखणी केली होती.
दरम्यान हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्यानंतर या प्रकल्पासाठी जमिनीच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली. मात्र या महामार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमीन धारकांच्या माध्यमातून जमिनीच्या मोबदल्याबाबत सध्या जोरदार संघर्ष केला जात आहे.
या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाच्या मावेजाच्या विषयात असंख्य तक्रारी प्रलंबित असतानाचं आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी हा प्रकल्प रद्दचं केला जाईल असे म्हटले आहे. खरे तर, गेल्या काही वर्षांपासून जमीन मोबदलासंदर्भात शेतकऱ्यांकडून सातत्याने आपली भूमिका मांडली जात आहे.
पण अजून पर्यंत याप्रकरणी सरकारकडून कोणत्याच प्रकारचे समाधान करण्यात आलेले नाही. अशातच आता अर्थमंत्री अन राज्याचे DCM अजित पवार यांनी शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाच्या मूळ प्रश्नाचे समाधान करण्याऐवजी त्यांनी या महामार्गासाठी शासनाकडे पैसा नाही, आम्ही ते काम थांबवलेले आहे.
गरज पडल्यास रस्ताही रद्द करू, असे सांगितले असल्याचा दावा कृति समितीकडून होतोय. काल, शुक्रवारी 28 फेब्रुवारी 2025 रोजी अजितदादा आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आले असता त्यांनी असं म्हटले असल्याचा दावा केला जातोय.
यावेळी पवार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये याबाबत शाब्दिक खडाजंगी सुद्धा रंगली, पण अजितदादांनी शेवटी आपण याप्रकरणी लक्ष घालणार असे म्हणतं संबंधितांना आश्वासित करण्याचे काम केले. यामुळे आता नेमका हा महामार्ग प्रकल्प रद्द होणार की शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.