Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित झालीत. राज्यात सुद्धा अनेक महामार्ग पूर्णपणे बांधून तयार झाली आहेत तर काही महामार्गांची कामे सुरू आहेत.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. हा महामार्ग प्रकल्प 701 किलोमीटर लांबीचा असून आतापर्यंत या प्रकल्पाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि त्यावर वाहतूक सुद्धा सुरू आहे.

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा भाग सर्वसामान्यांसाठी सुरू असून उर्वरित इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील लवकरच वाहतुक सेवेत दाखल होणार आहे.
एवढेच नाही तर नागपूर ते गोवा यादरम्यानही शक्तीपीठ महामार्ग विकसित केला जाणार असून या महामार्गाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली आहे. मात्र अजून या महामार्गाचे काम फक्त कागदावरच दिसत आहे.
दुसरीकडे समृद्धी महामार्गाला आणि शक्तिपीठ महामार्गाला जोडल्या जाणाऱ्या एका महामार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. महाराष्ट्राच्या द्रुतगती मार्गांच्या विस्तारात मोठी भर पडत असून, आता जालना-नांदेड ग्रीनफिल्ड प्रवेश-नियंत्रित एक्स्प्रेसवेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड आणि मोंटेकार्लो लिमिटेड या कंपन्यांनी नांदेड ते परभणी या मार्गावर भू-सफाई आणि झाडाझुडपांचे काढणीचे काम सुरू केले आहे.
या कामाचा स्पष्ट परिणाम आता उपग्रह प्रतिमांमध्येही दिसून येत आहे. जालना नांदेड महामार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले असल्याने या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय.
या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याची एकूण लांबी 180 कि.मी. इतकी असेल, हा एक प्रवेश-नियंत्रित एक्स्प्रेसवे असेल जो की मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला अन नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेसवेशी जोडला जाणार आहे.
त्यामुळे राज्यातील दळणवळण अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. या महामार्ग प्रकल्पाचा जालना नांदेड तसेच परभणी या तिन्ही जिल्ह्यांच्या कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अशा विविध क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
हा महामार्ग उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून यामुळे मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने विदर्भात जाता येईल आणि मुंबईच्या दिशेने सुद्धा येता येणे शक्य होणार आहे.