Maharashtra Government Employee : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल तर नक्कीच हा निर्णय तुमच्यासाठी मोठा दिलासाचा ठरणार आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. गेल्या महिन्यात राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्यात आणि आता या महिन्यात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत.

महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील सर्वच महानगरपालिकासाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी याचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत राज्य शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार 15 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसह 29 महानगरपालिका क्षेत्रांना लागू असेल अशी पण माहिती राज्य शासनाकडून यावेळी देण्यात आली आहे.
या सुट्टीचा राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मतदारांना महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता यावे या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारी रोजी मतदानासाठी जी सुट्टी देण्यात आली आहे ती सुट्टी या आदेश शासनाकडून जारी करण्यात आलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये समाविष्ट नव्हती.
म्हणजे आता वर्ष 2026 मध्ये राज्यातील सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 25 दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र ही सार्वजनिक सुट्टी फक्त आणि फक्त संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्षेत्रासाठी लागू राहणार आहे.
शासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात या संदर्भातील सविस्तर माहिती नमूद आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट सुद्धा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून या संदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही पण मुंबई महापालिकाची निवडणूक पाहता रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच तत्सम आदेश जारी करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या 15 जानेवारी रोजी च्या सुट्टी बाबत अजून अधिकृत निर्णय झालेला नसल्याची पण माहिती समोर आली आहे. यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पण सुट्टी जाहीर होणार का? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी राहणार आहे.













