Maharashtra Government Employee : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून वाढवण्यात आला होता.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील जवळपास 17 लाख शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा झाला.

आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून कमीत करण्यात आलेल्या शासननिर्णयाप्रमाणे 1 जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
बीएमसी अर्थातच मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 55 टक्क्यांवरून 58 टक्के एवढा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत दिला जाईल अशी माहिती शासन परिपत्रकातून समोर आली आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना अनुज्ञय करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना लागू राहणार आहे.
ही तीन टक्के महागाई भत्ता वाढ माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहणार नसल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. तसेच सुधारित महागाई भता ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे.
पण महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यांच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुद्धा ऑक्टोबरच्या मासिक वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि थकबाकीचा लाभ मिळणार आहे.
नक्कीच दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.













