राज्यात हवामानात मोठा बदल; उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

Published on -

Maharashtra Hawaman Andaj : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मागील 48 तासांपासून थंडीचा कडाका वाढलेला असतानाच, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होत असून, राज्यात तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. काही भागांत उकाडा वाढत असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांत हवामान अधिक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

सध्या केरळच्या किनारपट्टी भागांजवळ अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यातून कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत आहे. या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवत असून, राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांसाठी हा अंदाज देण्यात आला असून, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांसह इतर भागांतही पावसाची शक्यता आहे.

नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून पश्चिमेकडे सरकणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे हे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई शहर व उपनगरांसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं असून, रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. काही भागांत दमट हवामान वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे.

देशभरातील हवामानाचा विचार करता, पश्चिमी झंझावातांचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. केंद्रीय हवामान विभागानुसार 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी विविध राज्यांत पावसाची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ‘चिल्ला एक खुर्द’ पर्व सुरू झालं असून, थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी हलका पाऊस आणि उंच भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये धुक्याचा परिणाम अद्याप कायम राहण्याची शक्यता असून, यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe