Maharashtra Highway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा-२०२६ च्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर सुरू असलेले काम सुरळीत पार पडावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट (कोंढणपूर बाजू) हा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २६ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत हा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला होता. अशातच आता राज्यातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने अलीकडेच कन्नड–तलवाडा घाट मार्गावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे हाती घेतली जात असून, २५ नोव्हेंबर २०२४ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
या कालावधीत घाटरस्त्यावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली. तलवाडा घाट हा उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि गुजरातकडे जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
मात्र, औट्रम घाट २०२३ पासूनच जड वाहतुकीसाठी बंद असल्याने कन्नड–तलवाडा घाटावर जड वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता. आता या घाटाची दुरुस्ती हाती घेतल्याने दररोज धावणाऱ्या सुमारे १३ हजार जड वाहनांना वैजापूर–नांदगावमार्गे तब्बल ६० ते ७० किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागणार आहे.
एमएसआयडीसीला या दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली असून, तलवाडा घाटातील रस्ता सध्या अनेक ठिकाणी खराब स्थितीत आहे. औट्रम घाटाचा पर्यायी मार्गही मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने त्याच्या तातडीने दुरुस्तीचे आदेश न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे अनेक प्रमुख रस्ते जड वाहतुकीच्या भारामुळे उखडून गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण नियोजन करून वाहतूक वळविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
वाहतूकीचे पर्यायी मार्ग पहा
- छत्रपती संभाजीनगर–चाळीसगाव/धुळे (तलवाडा घाटमार्गे पूर्वी प्रवास करणारे वाहन)
साजापूर–लासूर–गंगापूर चौफुली–वैजापूर–येवला–मनमाड मार्गे चाळीसगाव व धुळे.
- छत्रपती संभाजीनगर–धुळे (तलवाडा घाटमार्गे जाणारी वाहने)
साजापूर–माळीवाडा–समृद्धी महामार्गाने झांबरगाव–गंगापूर चौफुली–वैजापूर–येवला–मनमाडमार्गे धुळे.
- जड वाहतूक (चाळीसगाव/धुळेकडे जाणारी)
साजापूर–कसाबखेडा फाटा–देवगाव रंगारी–शिऊर–वैजापूर–येवला–मनमाड–चाळीसगावमार्गे धुळे अशी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बदलांमुळे प्रवाशांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा योग्य वापर करावा तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा पोलिसांनी आवाहन केले आहे.













