Maharashtra HSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे.
१० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार असून, राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी लगबग पाहायला मिळणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. सकाळचे सत्र ११ ते २ या वेळेत, तर दुपारचे सत्र ३ ते ६ या वेळेत होणार आहे. राज्यभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते.
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र ही परीक्षा आयुष्याचा शेवट नसून केवळ शैक्षणिक मूल्यांकन आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी वाहतूक कोंडीचा विचार करून वेळेआधी घरातून निघावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
प्रवेशपत्रासोबत शाळेचे ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, मोजपट्टी, कंपास, पॅड, पाण्याची बाटली आणि साधे घड्याळ एवढेच साहित्य सोबत ठेवावे. मोबाईल फोन, पुस्तके किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात नेण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षा देताना प्रश्नपत्रिका शांतपणे वाचावी. प्रश्न अवघड वाटले तरी घाबरू नये आणि सोपे वाटले तरी घाई करू नये. उत्तरपत्रिकेवरील माहिती स्पष्ट व सुवाच्य अक्षरात भरावी.
बारकोड चिकटवण्यापूर्वी तो योग्य असल्याची खात्री करावी आणि निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाचाच वापर करावा.
पालकांनीही या काळात मुलांना मानसिक आधार द्यावा. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवून त्यांना सकारात्मक शब्दांत प्रोत्साहन द्यावे.
योग्य आहार, आरोग्याची काळजी आणि थोडासा व्यायाम यामुळे परीक्षेचा ताण नक्कीच कमी होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.











