Maharashtra JSW Factory : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 25 मे 2025 रोजी मन की बात कार्यक्रमात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या विषयांवर हात घातला. त्यांनी महाराष्ट्रात विकसित होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचा सुद्धा कालच्या मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 25 मे 2025 रोजी मन की बात कार्यक्रमाचा 122 वा भाग रेडिओवरून प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन संदर्भात मोठे विधान केले.

याशिवाय त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम काटेझारी गावाचा सुद्धा उल्लेख केला. खरे तर या नक्षल प्रभावित जिल्ह्यातील दुर्गम काटेझारी गावात प्रथमच एसटी बस पोहोचली असून, या ऐतिहासिक क्षणाचा उल्लेख स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 25 मे च्या 122 व्या मन की बात कार्यक्रमात केला.
ते म्हणालेत की एसटी बस पोहोचल्यानंतर काटेरी गावातील गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात एसटीचं स्वागत करत आनंद साजरा केला होता आणि ही घटना दुर्गम भागात पोहोचणाऱ्या विकासाच्या प्रवासाचा भाग असल्याचं मोदींनी आवर्जून नमूद केल आहे.
दरम्यान, एकेकाळी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या याच गडचिरोली जिल्ह्यात जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट विकसित होणार अशी सुद्धा माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये JSW ग्रुपने या जिल्ह्यात जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटची घोषणा केली आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण JSW ग्रुपने घोषणा केलेला आणि नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेल्या या प्लांटबाबत आणि प्रकल्प नेमका कसा असेल याचा आढावा आजच्या या लेखातून घेणार आहोत.
कसा असणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट ?
विदर्भातील गडचिरोलीमध्ये हा प्लांट तयार होईल, या प्रकल्पाची क्षमता 25 दशलक्ष टन इतकी राहणार असून, गडचिरोलीतील उच्च प्रतीच्या लोहखनिजामुळे भारत लोहखनिज उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकावर जाईल, असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.
यामुळे देशातील पोलाद उत्पादनवाढीला चालना मिळेल आणि आयातीवरील अवलंबित्व सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकल्पाची घोषणा केली होती. सज्जन जिंदाल यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देताना असे सांगितले की गडचिरोलीमध्ये लवकरच जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट विकसित होईल.
खरे तर सध्या भारतातील भिलाई येथील स्टील प्लांट हा देशातील सर्वात मोठा स्टील प्लांट म्हणून ओळखला जातो. परंतु गडचिरोली येथे जो स्टील प्लांट तयार होणार आहे तो भारतातील भिलाई येथील सर्वात मोठ्या स्टील युनिटपेक्षा तिप्पट आकाराचा असेल.
हा केवळ भारतातील आणि आशिया खंडातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट राहणार आहे. हा स्टील प्लांट जगातील सर्वात मोठा राहील सोबतच हा पर्यावरणपूरक प्लांट देखील असेल असेही जेएसडब्ल्यू समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हा प्रस्तावित स्टील प्लांट तब्बल एक लाख कोटी रुपयांचा असेल आणि या प्लांटची वार्षिक क्षमता ही 25 दशलक्ष टन इतकी राहणार आहे. सध्या भिलाई येथे जो स्टील प्लांट आहे त्याची वार्षिक क्षमता फक्त सात दशलक्ष टन एवढी आहे. म्हणजेच या प्लांट पेक्षा गडचिरोलीचा प्लांट तीन पटीने मोठा राहणार आहे.
कधी सुरू होणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट?
एवढेच नाही तर सध्या देशाची एकूण स्टिल प्लांट क्षमता 18 दशलक्ष टन इतकी असून या राष्ट्रीय क्षमतेपेक्षाही गडचिरोलीच्या प्लांटची क्षमता अधिक राहणार आहे. दरम्यान गडचिरोली येथे प्रस्तावित करण्यात आलेला हा प्लांट सात वर्षात पूर्ण होईल अशी माहिती समूहाकडून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पहिला टप्पा चार वर्षातच पूर्ण होईल असे समूहाचे अध्यक्ष जिंदाल यांनी स्पष्ट केले आहे.