12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील 3 महिने दर्शनासाठी बंद राहणार ! कारण काय ?

Maharashtra Jyotirling Temple Closed : भारतासह संपूर्ण जगभरातील शिवभक्तांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही येत्या काळात बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

कारण की महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मंदिर पुढील तीन महिन्यांसाठी सर्वसामान्य भाविकांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने दर्शनासाठी बंद राहणार आहे.

हा निर्णय मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच घेण्यात आला असून हा निर्णय घेण्याच नेमकं कारण काय? याबाबत आज आपण येथे माहिती पाहणार आहोत.

कधीपासून बंद होणार मंदिर ?

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नववर्षात हे मंदिर बंद राहणार आहे. म्हणजेच तुम्ही नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भगवान शिव शंकराच्या दर्शनाला जाणार असाल तर नक्कीच ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

9 जानेवारी 2026 पासून भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवले जाणार आहे. या काळात महाशिवरात्रीचा मोठा सण येणार असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुले केले जाईल मात्र उर्वरित काळात हे मंदिर बंद राहील.

श्री क्षेत्र भिमाशंकर संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

खरे तर या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यानुसार आता मंदिर परिसरात विविध कामे केले जाणार आहेत. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच बांधकाम सुद्धा केले जाणार आहे.

दरम्यान मंदिराच्या कामांमुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित रहावी या अनुषंगाने आणि नियोजित कामे नियोजनबद्ध व दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण व्हावेत यासाठी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून नऊ जानेवारीपासून पुढे तीन महिने मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने 12 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मंदिर खुले राहणार आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर फक्त सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदिरातील पूजा अर्चना नेहमीप्रमाणे तशीच सुरू राहील.