Maharashtra Metro Train : वंदे भारत ट्रेननंतर आता रेल्वेने नवीन भेट दिली आहे. देशात वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद ते भुज या दरम्यान देशातील पहिली वंदे भारत मेट्रो सुरु झाली असून आपल्या महाराष्ट्रातला देखील लवकरच या गाडीची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.
छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानक ते नागपूर यादरम्यान ही गाडी चालवली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावर जर ही गाडी सुरू झाली तर हा प्रवास फक्त चार तासांत पूर्ण होणार आहे. छत्तीसगडमध्ये यासाठी तयारी सुरू झाली आहे.

छत्तीसगड राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. छत्तीसगडमध्ये सध्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातून 11 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान, आता वंदे भारत ट्रेननंतर भारतीय रेल्वे राज्याला आणखी एक भेट देणार आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत मेट्रो ट्रेनची भेट मिळणार आहे.
छत्तीसगडमधील पहिली वंदे मेट्रो ट्रेन दुर्गहून नागपूरला रवाना होणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. वंदे मेट्रो ट्रेनने दुर्ग ते नागपूर हे अंतर ४ तासात कापले जाणार आहे. दुर्ग ते नागपूर हे अंतर सुमारे 262 किमी आहे.
या ट्रेनचे भाडे वंदे भारत ट्रेनपेक्षा कमी असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे वंदे भारत मेट्रोच नाही तर देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे.
ही स्लीपर ट्रेन येत्या तीन महिन्यांच्या काळात रुळावर धावताना आपल्याला दिसू शकते. स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनीचं ही माहिती दिली आहे.