Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याला आता आणखी एक महामार्ग मिळणार आहे. खरंतर मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्ग प्रकल्पापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे.
महत्वाचे म्हणजे या महामार्गाचा बाकी राहिलेला 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा टप्पा येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी सुरू होईल आणि त्यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका सहा पदरी महामार्गाची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले असून या महामार्ग प्रकल्पाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी सुद्धा मिळालेली आहे.
केंद्रीय कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहार समितीने 19 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील जेएनपीए पोर्ट (पागोटे) ते चोक या 29.219 किमी लांबीच्या सहा-लेन प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीला मंजुरी दिली असल्याची बातमी हाती आली आहे.
हा प्रकल्प बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजे बीओटी तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी 4,500.62 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत आज आपण या रस्ते प्रकल्पाची संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा प्रकल्प?
मिळालेल्या माहितीनुसार हा नवा महामार्ग जेएनपीए पोर्ट (NH 348) जवळील पागोटे गावातून सुरू होऊन मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) येथे संपणार आहे. या प्रकल्पासाठी 4500 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
हा प्रकल्प, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) यांना सुद्धा जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईहून गोवा महामार्गाकडे जाण्यासाठीचा प्रवास मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज (अटल सेतू) पासून केवळ 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे, असा सरकारचा दावा आहे.
या नव्या सहा-लेन ग्रीनफिल्ड महामार्गामुळे बंदरांसोबतची जोडणी वाढणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे मालवाहतुकीला अधिक सुरक्षित व कार्यक्षम पर्याय उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे परिसरातील औद्योगिक आणि व्यापारी वाढीस चालना मिळणार आहे.
प्रारंभीचा 30 किमी लांबीचा टप्पा 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, लवकरच कामाचे आदेश दिले जाणार आहेत. येत्या सात महिन्यांत प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. NHAI चे प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या 10,000 हून अधिक वाहने, विशेषतः बहु-अक्ष कंटेनर ट्रक्स, वेगवेगळ्या महामार्गांवरून प्रवास करतात.
या नवीन महामार्गामुळे वाहतुकीचा त्रास कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल. सध्या जेएनपीए पोर्ट ते मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि गोल्डन क्वाड्रिलॅटरल (NH-48) विभागापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना जवळपास 2-3 तास लागतात.
कारण पळस्पे फाटा, डी-पॉइंट, कळंबोली जंक्शन, पनवेल यांसारख्या शहरी भागात दररोज सुमारे 1.8 लाख PCU वाहतूक धावत असल्याने मोठी गर्दी होत असते. 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर या ठिकाणी वाहनांची गर्दी आणखी वाढणार आहे आणि म्हणून या मार्गावर थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढणार आहे.