Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित करण्यात आला असून या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.
यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग सुद्धा विकसित केला जाणार आहे. सुरत चेन्नई महामार्ग देखील आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे आणि याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाईल.

दरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे रिंग रोड सारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे देखील हाती घेण्यात आली आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुणे व आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करावे अशी मागणी उपस्थित केली आहे.
या तीन महामार्गांचे रुंदीकरण करण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक फाटा ते खेड (राष्ट्रीय महामार्ग क्र. 60), हडपसर ते यवत (राष्ट्रीय महामार्ग क्र. 65) तसेच तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 डी) यांचे तातडीने रुंदीकरण करावे अशी मागणी उपस्थित केली आहे.
यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अजित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे या संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी उपस्थित केली असून यामुळे या तीनही महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय आता निकाली निघेल अशी आशा आहे.
यातील सध्या स्थितीला चार पदरी असणारे नाशिक फाटा ते खेड आणि हडपसर ते यवत हे दोन राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्याची आणि तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा दोन पदरी महामार्ग चार पदरी करण्याची मागणी आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या मागणीला केंद्राकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.