Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका आधुनिक प्रवेश नियंत्रित महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धीच्या धरतीवर हा महामार्ग विकसित होणार असून याची लांबी समृद्धीपेक्षा जास्त राहणार अशी माहिती समोर येत आहे. खरे तर या महामार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
गेल्या वर्षी या महामार्गाची अधिसूचना सरकारने रद्द केली होती पण आता पुन्हा एकदा या महामार्गाला शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारने नुकतीच मान्यता दिली असून हा प्रकल्प ज्या ठिकाणी विरोध होता त्या ऐवजी दुसऱ्या भागातून वळवण्यात आला आहे.

मुंबई ते नागपूर आणि पुढे गोवा हा प्रवास अतिजलद आणि सुलभ व्हावा यासाठी फडणवीस सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा मागासलेल्या भागाला होणार असा दावा त्यांनी केला आहे.
यामुळे मराठवाड्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांकडून सातत्याने व्यक्त केला जातोय. दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत एक नवीन माहितीसमोर आले आहे ती म्हणजे या महामार्गाची लांबी आणखी वाढणार आहे. या महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये बदल झाला असल्याने याची लांबी पण वाढणार अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रस्तावित असलेल्या नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात वाढत्या विरोधामुळे बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाला सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता.
शेतकऱ्यांनी आमच्या बागायती जमिनी महामार्गात जातील अशी भीती व्यक्त करत महामार्ग प्रकल्पाला जोरदार विरोध दाखवला. यामुळे सरकारने या महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये बदल करत हा महामार्ग प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून प्रस्तावित केला आहे. याचाच परिणाम म्हणून महामार्गाची लांबी जवळपास 38 ते 39 km ने वाढली आहे.
आधी 801 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित असलेला हा महामार्ग आता सुधारित संरेखनानुसार सुमारे 840 किलोमीटरचा होणार अशी माहिती समोर येत आहे. स्थानिक जमिनमालकांच्या विरोधामुळे या महामार्गाच्या जवळपास 280 किलोमीटरच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. नवीन संरेखनाचा प्रस्ताव येत्या आठवडाभरात अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एमएसआरडीसीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट कोकणाशी जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाची योजना आखली आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार असल्याने त्याला ‘शक्तिपीठ महामार्ग’ असे नाव देण्यात आले.
सुरुवातीला हा महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांतून जाणार होता. मात्र आता हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून पण जाणार आहे. म्हणजेच या महामार्गाची व्याप्ती वाढली आहे आणि आता हा मार्ग एकूण 13 जिल्ह्यांमधून जाईल. सध्या महामार्गाच्या संयुक्त मोजणीचे काम सुरू असून त्यापैकी सुमारे 60 टक्के मोजणी पूर्ण झाली आहे.
मात्र सोलापूरनंतरच्या मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या संरेखनानुसार सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला असून कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ मार्ग बदलून हा महामार्ग चंदगड आणि आजरा परिसरातून नेण्यात येणार आहे.त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमधील काही भागांवरील महामार्गाचा भार टळणार आहे.
यापूर्वी शक्तिपीठ महामार्ग हा जुन्या कोल्हापूर–नागपूर महामार्गाच्या जवळून जाणार असल्याने दोन समांतर महामार्गांची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. हे टाळण्यासाठी आता हा महामार्ग जुन्या मार्गापासून दूर, नव्या संरेखनातून जाणार आहे. चंदगड–आजरा भागात सुमारे 10 किलोमीटरने, तर साताऱ्यासह इतर भागांच्या समावेशामुळे एकूण लांबी सुमारे 25 किलोमीटरने वाढली आहे.
स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन करण्यात आलेले हे बदल भविष्यातील अडथळे कमी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या महामार्गाच्या सुधारित अलाइनमेंटचा प्रस्ताव राज्य सरकारकडे लवकरच सादर होणार असून लवकरच राज्य सरकार या प्रस्तावाला मान्यता सुद्धा देण्याची शक्यता आहे.













