महाराष्ट्राला आणखी 4 नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार लाभ

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आगामी काळात नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. राज्यात येत्या काही महिन्यांनी चार नवे महामार्ग विकसित केले जातील.

Updated on -

Maharashtra New Expressway : राज्यातील रस्त्याचे नेटवर्क वाढवण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत. राज्यात सध्या अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर काही महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान आज आपण महाराष्ट्रात प्रस्तावित असणाऱ्या चार महामार्ग प्रकल्पांची माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रस्तावित चार प्रमुख महामार्ग प्रकल्प

नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग : पूर्व महाराष्ट्रातील हा महामार्ग प्रकल्प विदर्भातील विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील नागपूर ते गोंदिया दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

नागपूर, भंडारा, तिरोडा आणि गोंदियाला मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाशी जोडणे हे या महामार्ग प्रकल्पाचे सर्वात मोठे उद्दिष्टे आहे. हा महामार्ग प्रकल्प चार पदरी किंवा सहा पदरी राहू शकतो. या प्रकल्पासाठी जवळपास 15,500 कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे आणि हा प्रकल्प सध्या बोली प्रक्रियेच्या स्थितीत आहे.

नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणी देणारा असल्याने याला शक्तीपीठ असे नाव देण्यात आले आहे. हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प असेल असे म्हटले जात आहे.

नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग 801 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. समृद्धी महामार्गापेक्षा या महामार्गाची लांबी 100 किलोमीटरने अधिक राहणार असून यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे.

या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाईल. सध्या या प्रकल्पाचा शेतकऱ्यांकडून विरोध होतोय तरीही राज्य शासनाने हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असे म्हटले आहे. हा एक सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्प असेल. हा प्रकल्प महाराष्ट्रातील 11 आणि गोव्यातील एका जिल्ह्याला जोडणारा आहे.

वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्गसह राज्यातील अन्य काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना हा महामार्ग जोडणारा. नागपूर ते गोवा असा प्रवास करायचा असेल तर सध्या 18 ते 20 तासांचा वेळ लागतो मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास कालावधी आठ ते दहा तासांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग : विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नागपूर आणि चंद्रपूर दरम्यान संपर्क सुधारणा हे या प्रकल्पाचे सर्वात मोठे उद्दिष्टे असून सध्या हा प्रकल्प बोली प्रक्रियेत आहे.

भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग : भंडारा ते गडचिरोली दरम्यान विकसित होणारा महामार्ग प्रकल्प हा विदर्भातील आणखी एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट. हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून यामुळे भंडारा आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत.

विदर्भातील या दोन्ही जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी या प्रकल्पामुळे वाढणार असून या जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी बोली प्रक्रिया सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe