Maharashtra New Expressway : वर्ष 2015, तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सीएम देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली. दरम्यान, आता दहा वर्षांनी सीएम फडणवीस यांनी घोषित केलेला हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मार्च 2025 मध्ये हा महामार्ग प्रकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी पूर्णपणे खुला होणार आहे. 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्ग प्रकल्पामुळे 16 तासांचा प्रवास फक्त आठ तासात होणार आहे.
प्रवासाचा कालावधी तर निम्म्यावर येणारच आहे याशिवाय इंधनात देखील मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास वेगवान होईल. आम्ही ज्या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलत आहोत तो आहे समृद्धी महामार्ग. दरम्यान आज आपण समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे प्रकल्प ?
समृद्धी महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये केली होती. हा फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट. या अंतर्गत मुंबई ते नागपूर दरम्यान ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार केला जातोय. खरे तर हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प असून याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
आतापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचा 625 km लांबीचा भाग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. सर्वप्रथम या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता, या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाला. यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे 2023 मध्ये उद्घाटन झाले ज्या अंतर्गत शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला.
पुढे 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी या 25 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन झाले. अशा तऱ्हेने आत्तापर्यंत नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. आता या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा अर्थात इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा खुला होणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होईल. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा 15 मार्च च्या सुमारास खुला केला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाला 10 वर्षे लागलेत
समृद्धी महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला होता. या प्रकल्पाचे काम एकूण 16 फेजमध्ये पूर्ण करण्यात आले. हा महामार्ग प्रकल्प राज्यातील नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, अहिल्यानगर, ठाणे या जिल्ह्यांमधून जातो.
हा प्रकल्प जवळपास राज्यातील 360 गावांना कव्हर करतो. समृद्धी एक्सप्रेसवेचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अंडरपास आणि ओव्हरपास सुद्धा तयार करण्यात आले आहेत.
या एक्सप्रेस वे वर 33 मोठे पूल, 274 लहान पूल, 6 बोगदे आणि 65 उड्डाणपुल बांधले गेले आहेत. त्याच वेळी, कसारा घाट येथे सर्वात लांब बोगदा बांधला गेला आहे. हा महामार्ग प्रकल्प सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे.
आतापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचा 625 km चा मार्ग वाहतुकीसाठी सुरु होता, मात्र आता उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा मार्ग देखील मार्च महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित झालेली नाही मात्र लवकरच तारीखही समोर येईल अशी आशा आहे.